लोकमत सवे सर्वेक्षण नवमतदारांचा कौल
आज इंटरनेटच्या शोधामुळे माहितीच्या देवाणघेवाणीस गतिमानता येऊन प्रत्येक व्यक्ती माहितीचा जलद असा वाहक झाला आहे. आणि आताचा काळ तर सोशल मीडियाचा काळ आहे. अगदी ‘सोशल मीडियाचे युग’ असे म्हटले तरी काही वावगे होणार नाही. अलीकडच्या काळात सर्वाधिक तरुणांची संख्या आपल्या देशात आहे. पूर्वी तरुणाईला माध्यम म्हणून व्यक्त होण्यासाठी पर्याय उपलब्ध नव्हता. आज मात्र सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेक सक्षम पर्याय तरुणाईसाठी उपलब्ध आहेत. आजची तरुण पिढी बहुआयामी विचार करणारी आहे. प्रत्येक तरुण आपला स्वतंत्र विचार व्यक्त करण्यासाठी उत्सुक आहे. जगभरात घडणाºया प्रत्येक घटनेकडे आजची तरुणाई लक्ष ठेऊन असते व व्यक्त होते. इंटरनेटमुळे जग हे 'वैश्विक खेडे' बनले आहे. माहितीचे महाद्वारच आज समाजासाठी ‘इंटरनेट’ने खुले झाले आहे. नुकत्याच होऊ घातलेल्या लोकसभा निवडणुकीसंदर्भात आजची नवमतदार पिढी काय विचार करते हे जाणून घेण्यासाठी प्रश्नावली घेऊन आम्ही जेव्हा तरुणांपर्यंत पोहोचलो, तेव्हा त्यांच्या मनातल्या अनेक बाबी प्रश्नावलीतील प्रश्नांच्या उत्तरांच्या माध्यमातून व्यक्त झाल्या.
आजच्या तरुणांचा राजकीय व्यवस्थेवर विश्वास काही प्रमाणात आहे. तर बहुतांश तरुण हे आजच्या राजकीय व्यवस्थेवर विश्वास नाही म्हणून आपले मत मांडत होते. नक्की काय उत्तर द्यावे यात काहींचा गोंधळ होत होता. कारण राजकीय पक्ष पटेल तेव्हा युती आणि लगेच काडीमोड घेतांना दिसतात. एकमेकांवर टीका करणारे पक्ष व नेता राजकीय स्वार्थासाठी कधी संधाण साधतील ते सांगता येत नाही. अशा परिस्थितीत राजकीय पक्षांच्या एकमेकांसोबत असलेल्या धरसोड वृत्तीमुळे कुणावर विश्वास ठेवावा आणि कुणावर ठेवू यावर संभ्रम निर्माण होतो, या मताचे होते.
तुम्ही कोणती विचारसरणी मानता? डावी की उजवी, असा प्रश्न विचारल्यावर डाव्या आणि उजव्या विचारसरणींबाबत सांगायचे झाल्यास या दोघांमध्ये समतोल साधणारी विचारसरणी मानणारा आजचा नवमतदार आहे. संधी साधणारी वेळेनुरूप डावी किंवा उजवी अशा राजकीय विचारसरणीला तरुणांचा विरोध आहे. देशाच्या विकासासाठी प्रयत्न करणारी काही तरुण डावी व उजवी विचारसरणी म्हणजे काय, असा प्रश्न विचारत होती. उजवी विचारसरणी म्हणजे मोदींची विचारसरणी का तर आम्ही उजवी विचारसरणी मानणारे आहोत, असेही पुटपुटत होते. देशाच्या व जनतेच्या भल्यासाठी प्रामाणिक कृती करणारी विचारसरणी मग ती कोणती का असेना ती आम्ही मानतो, असे ही मुद्दे मांडले जात होते.
तुमच्या मताला लोकशाहीत किंमत आहे, असा विश्वास वाटतो का? अर्थात किंमत आहे एका मताला किंमत नक्कीच आहे. लोकांनी लोकांसाठी चालविलेले राज्य अशी लोकशाहीची व्याख्या असताना मतदान हा मतदाराला राज्यघटनेने बहाल केलेला अधिकार आहे म्हणून आमच्या मताला निश्चित किंमत आहे. कारण एका मतामध्ये सरकार उलथवून टाकण्याची ताकत असून मतदान करणे प्रत्येकाचे कर्तव्य असल्याचे तरुणाईचे मत होते. लोकसभेच्या निवडणुकीत आम्ही सगळे नक्कीच मतदान करणार असून लोकशाही बळकट होण्यासाठी देशाच्या व जनतेच्या विकासासाठी मतदान करणारच, असा निर्धार व्यक्त केला. आजची पिढी मत देण्याच्या बाबतीत चोखंदळ झाली असून पक्ष पाहून मतदान करण्याचे दिवस आता राहिले नाही. आज उमेदवार पाहून मतदान करण्याकडे कल वाढला आहे. उमेदवार कर्तृत्ववान व जनतेच्या भल्यासाठी प्रामाणिक काम करणारा असेल तर मतदान असा तरुणांचा मतप्रवाह प्रश्नावली भरून घेतांना जाणवत होता. नवमतदारांच्या राजकीय नेत्याबाबतच्या अपेक्षा वाढल्या असून आज सर्वाधिक संख्या तरुणांची देशात असल्याने शिक्षण व रोजगार मिळवून देणारा उमेदवार तरुणांना नेता म्हणून निवडून द्यावयाचा आहे. योग्य शिक्षण व रोजगार मिळाल्यास सर्वच समस्या सोडवण्यास मदत होईल, असे नवमतदार मुले सांगत होती. जात आणि धर्म हा पूर्वी अस्मितेचा विषय बनवून जनतेला गृहीत धरण्याचा काळ आता बदललेला आहे. या मुद्यांच्या आधारे घाणेरडे राजकारण ही पिढी यापुढे खपवून घेणार नाही. तरुण मतदारांच्या अपेक्षा वाढल्या असून राजकारण हे निकोप असावे.जाती-धर्माच्या मुद्यावर जनतेला जास्त दिवस फसवणे बरोबर नसून आगामी काळात राजकारण्यांचे हे राजकारण फोल ठरणार आहे. आज मतदारांच्या अपेक्षा व गरजा बदललेल्या आहेत. आज महितीची अनेक माध्यमे खुली झाल्याने ही पिढी वैचारिकदृष्ट्या सक्षम झाली असून जाती-धर्माची पट्टी गळून पडणार आहे. जाती-धर्माचे राजकारण पुढच्या काळात यशस्वी होणार नाही हे मात्र निश्चित.
बरेच तरुण मोदींसाठी प्रश्नावली भरतोय म्हणून सांगत होते. आज तरुणांकडे स्मार्टफोन असूनही बºयाच तरुणांना ‘ईमेल आयडी’ माहीत नाही, बनवायचा आहे असेही म्हणतांना दिसत होते.
एकंदरीत तरुण पिढीला ‘मुंगेरीलाल के हसीन सपने’ दाखवून चालणार नाही. कारण ‘त’ म्हणजे तपेले ओळखणारी आजची तरुण पिढी आहे. गृहीत धरण्याचा काळ आता राहिलेला नाही. त्यांच्या डोळ्यातली स्वप्ने प्रत्यक्ष कृतीत आणायला क्रांती करण्यासाठी देखील हे तरुण सज्ज आहेत. कारण ते स्वत: बरोबरच देशाचा विचार करायला लागले आहेत. राजकीय मानसिकता बदलायला नवमतदार कारणीभूत ठरतील का, हे येणारा काळच ठरवेल.
- वसंत कुलकर्णी
Comments
Post a Comment